सोलापूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मोफत पाठ्यपुस्तक योजना सन २०२६-२७’ चा सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील १ लाख पाठ्यपुस्तके सोलापूर मनपा मराठी केंद्र शाळा क्रमांक ६ येथे पोहोचली आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडावीत या दृष्टीने प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर आणि प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्या थेट मार्गदर्शन व नियंत्रणाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
चालू शैक्षणिक वर्षात मनपा क्षेत्रात इयत्ता १ ली ते ८ वीच्या एकूण ७२ हजार ३६३ लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकूण ४ लाख ५० हजार ९८० पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सध्या ९५ हजार ते १ लाख पुस्तके प्रशासनाला प्राप्त झाली असून, उर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध होणार आहेत.
६ माध्यमांच्या ३२६ शाळांना होणार पुरवठा
सोलापूर शहरातील मनपा आणि खाजगी अनुदानित अशा एकूण ३२६ शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलापूरच्या बहुभाषिक संस्कृतीचा विचार करता ६ वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये ही पुस्तके वितरित केली जातील. माध्यमनिहाय शाळांची संख्या अशी : मराठी माध्यम: २१८ शाळा,
उर्दू माध्यम: ५२ शाळा, कन्नड माध्यम: १४ शाळा,
तेलुगू माध्यम: ०३ शाळा, हिंदी माध्यम: ०२ शाळा,
इंग्रजी माध्यम: ०२ शाळा, एकूण: ३२६ शाळा.
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील : मल्हारी माने
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी मनपा शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. बालभारतीकडून पुस्तकांचा पहिला साठा प्राप्त झाला असून, त्याचे नियोजनबद्ध वितरण लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी दिली.
Post Views: 18