बार्शी – विवाहानंतर चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरुन पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका रोहित घोंगडे (वय ३२, रा. हनुमान मंदिर पान खुंट, शिंदे ज्वेलर्स समोर, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांचा विवाह रोहित राजेंद्र घोंगडे यांच्यासोबत दि. २८ मार्च २०२६ रोजी आळंदी, पुणे येथे नोंदणी पद्धतीने झाला होता. विवाहानंतर त्या पतीसह सासू-सासऱ्यांसोबत बार्शी येथे राहत होत्या. सुरुवातीला काही दिवस व्यवस्थित वागणूक मिळाल्यानंतर पती, सासू आणि सासरे यांनी घरगुती कारणांवरुन तसेच चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरात तांदूळ साफ करत असताना काही तांदूळ सांडल्याच्या कारणावरुन सासू सुनंदा राजेंद्र घोंगडे यांनी शिवीगाळ करुन केसाला धरुन गळा दाबत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ‘तुला नांदवायचे नाही, येथून निघून जा’, असे म्हणत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सासरे राजेंद्र घोंगडे यांनीही शिवीगाळ करुन चापट मारल्याचे तसेच पती रोहित घोंगडे यांनीही मारहाण करण्यास प्रवृत्त करत ‘मला तिला नांदवायचे नाही’ असे म्हटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 8