सोलापूर : अतिक्रमण मोहिमेत जप्त करून स्टोअर रूम मध्ये जमा केलेले जुने लोखंडी भंगार साहित्य महानगरपालिकेच्या परस्पर चोरून घेऊन जात असताना बुलडोझर बाबा अशी ओळख असलेला अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे सह टेम्पो चालकास रंगेहात पकडण्यात आले .यावेळी टेम्पो व टेम्पोमध्ये भरलेला भंगार साहित्य मिळून १ लाख ३० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे .
दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी जगन्नाथ बनसोडे सह आठ जणांविरुद्ध भंगार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मनपा अतिक्रमण प्रतिबंधक प्रमुख जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पोचालक जमीर हैदर इनामदार (वय ४७, रा. नई जिंदगी, सोलापूर) व देखरेख करणारे कर्मचारी व अन्य तीन अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत पालिकेचे उपअभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे .
सोलापूर शहरात ठिकठिकाणच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या स्टोअर रूम मध्ये उघड्या जागेत ठेवले जाते . हे जप्त करण्यात आलेले साहित्य सांभाळण्याची किंवा दंडात्मक पावती फाडून ते सोडण्याची कायदेशीर जबाबदारी यातील वरील आरोपींवर होती. मात्र आरोपींनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता एकमेकाशी संगणमत करून भंगार साहित्य चोरून टेम्पो (क्रं. एम एच १३ सी यु १५८३ )मध्ये भरून नेताना सोमवार रोजी दुपारी चार वाजता महापालिका आवारात मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पाटील हे करत आहेत.
चौकट –
आरोपी टेम्पो चालकास अटक : चार दिवसांची पोलीस कोठडी
सदर गुन्ह्यात टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार (वय ४७, रा. नई जिंदगी, सोलापूर) या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला आज मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या . पेटकर यांनी त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . यात सरकारतर्फे ऍड ज्योती वाघमारे यांनी काम पहिल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासीक अमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील यांनी दिली .
Post Views: 9