सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडून बोगस बांधकाम परवाना घेऊन बांधलेल्या शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई हाती घेण्यात आली असून १९ ते २३ मे २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांतील ९ ठिकाणी नियोजित कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आज मंगळवारी या धडक पाडकाम मोहिमेस पाच्छा पेठ येथून सुरुवात करण्यात आली. संबंधित दोन इमारतीतील तळमजल्यातील ६ गाळे आणि पत्रा शेड जमीनदोस्त करण्यात आले.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच मजरेवाडी, सहारा नगर परिसरात उभारलेल्या बहुमजली इमारतींसाठी पालिकेतील तत्कालीन चार अधिकारी, परवानाधारक अभियंते आणि बिल्डर्स यांच्या संगनमताने बोगस बांधकाम परवाने तयार करण्यात केले होते. त्यानुसार या इमारती उभारण्यात आल्या. आता या इमारती बेकायदेशीर ठरल्या असून, लाखो रुपयांची गुंतवणूक करणारे नागरिक अडचणीत आले आहेत. महापालिकेत एकूण ९६ बोगस बांधकाम परवाने उघडकीस आले होते. आयुक्तांनी या इमारतीच्या पाडकामाचे आदेश दिल्यानंतर यातील ३५ जणांनी कारवाई थांबविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी १९ ते २३ मे २०२६ असे सलग पाच दिवस एकूण ९ इमारतींचे पाडकाम करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकामांवर महापालिका प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले असून पाच्छा पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, मजरेवाडी, उत्तर सदर बाजार व भवानी पेठ परिसरातील बहुमजली इमारतींवर कारवाई होणार आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार १९ मे २०२६ रोजी पाच्छा पेठ येथील स्क्वेअर वन बिल्डर्स यांच्या तळमजला अधिक ८ मजली बांधकाम असलेले तसेच मुमताज बेगम व इब्राहीम किल्लेदार यांच्या तळमजला अधिक ७ मजली इमारत येथे कारवाई करण्यात आली. सकाळी ११ वाजता महापालिकेचे पथक आवश्यकता यंत्रणेसह तगड्या पोलीस बंदोबस्तात पाच्छा पेठेत त्या ठिकाणी दाखल झाले. सुरुवातीला स्क्वेअर वन बिल्डर्सच्या मॅजेस्टिक स्क्वेअर बिल्डिंग येथील तळमजला पार्किंग मधील अनधिकृत तीन गाळ्यांवर हातोडा मारण्यात आला. या ठिकाणी सुरुवातीला येथील काही जणांनी विरोध दर्शवला. त्यानंतरही कारवाई करण्यात आली. येथील आठव्या मजल्यावरील फ्लॅटधारकांनाही अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र संबंधित बिल्डरने वेळ मागितली आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुमताज बेगम व इब्राहीम किल्लेदार यांच्या तळमजला अधिक ७ मजली इमारत येथे कारवाई करून या ठिकाणचे पार्किंग मधील अनधिकृत तीन गाळे आणि इतर पत्रा शेड जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाकडून नियमबाह्य बांधकामांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
कारवाईवेळी हे अधिकारी होते उपस्थित
यावेळी सहसंचालक नगररचना समीर शितोळे,
नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता जोशी , सहाय्यक अभियंता शकील शेख, झरतार, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे , बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दिपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार , अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमण विभागातील सर्व पोलीस , जेलरोड पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चार ब्रेकरसह जेसीबीचा उपयोग
अनधिकृत बांधकाम पाडकामासाठी महापालिकेने चार ब्रेकर, एक जेसीबी, दहा मजूर, 9 कनिष्ठ अभियंता , दोन सहाय्यक अभियंता, एक कार्यकारी अभियंता त्याचबरोबर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशी मोठी यंत्रणा कार्यरत होती.
असे आहे कारवाईचे वेळापत्रक ;
२३ मेपर्यंत ९ ठिकाणी कारवाई
२० मे २०२६ रोजी शुक्रवार पेठेतील फैज अहमद हाजी व अकबर बागवान यांच्या पार्किंग अधिक ७ मजली इमारतीसह उत्तर सदर बाजार येथील एम. शफी व एम. यासीन शेख यांच्या तळमजला अधिक ७ मजली बांधकामावर कारवाईचे नियोजन आहे.
२१ मे २०२६ रोजी गुरुवार पेठेतील ताहेरा बागवान यांच्या तळमजला अधिक ७ मजली इमारतीवर तसेच शनिवार पेठेतील खुदाबक्ष हाजी यांच्या तळघर, तळमजला अधिक ८ मजली बांधकामावर महापालिकेची कारवाई होणार आहे.त्यानंतर २२ मे रोजी मजरेवाडीतील बसवेश्वर नगर परिसरातील ग्लोबल इन्फ्राकॉनशी संबंधित बांधकाम तसेच सहारा नगर येथील मुमताज रहमान सिद्दकी व इतर यांच्या इमारतीवर कारवाई केली जाणार आहे. २३ मे रोजी भवानी पेठेतील विनायक ढंगे यांच्या पार्किंग अधिक ५ मजली बांधकामावर कारवाई होणार आहे.
एकूण १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती
दरम्यान, या कारवाईसाठी नगररचना विभागाचे उपसंचालक विनय झगडे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कारवाईच्या नियोजनासाठी सहसंचालक नगररचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, उपअभियंता अविनाश वाघमारे , जीएस पुकाळे , झोन अधिकारी यांच्यासह एकूण १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील चार दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे.
Post Views: 9