
सोलापूर, – रेल्वेच्या ७९ व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू आणि बिजापूर क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या सामन्यात शानदार विजय नोंदवले.
रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू संघाने एम.एस. आर.टी.सी. संघाचा १० गडी राखून एकतर्फी पराभव केला. साऊथ सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत त्यांच्या गोलंदाजांनी एम.एस.आर.टी.सी.चा डाव अवघ्या १४ षटकांत ५८ धावांवर गुंडाळला. एम.एस.आर.टी.सी.कडून श्रीपती होटकर याने १६ तर अनिल नागसरे याने ११ धावा केल्या. साऊथ सोलापूरच्या अतुल पवारने २१ धावांत ४ बळी घेत मुख्य खिंडार पाडले. त्याला स्वप्निल हंचाटे आणि बालकृष्ण काशीद यांनी प्रत्येकी २, तर अतुल चौधरीने १ बळी घेत उत्तम साथ दिली. ५९ धावांचे छोटे आव्हान साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू संघाने अवघ्या ५ षटकांत एकही गडी न गमावता ६० धावा करत पूर्ण केले. यात निरंजन कदमने नाबाद ३३ आणि मंदार काळेने नाबाद २० धावांची खेळी केली. ४ बळी घेणाऱ्या अतुल संजय पवार याला श्रावण चिट्यालकर, विक्रांत पवार, प्रवीण देशेट्टी आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्याचे पंच म्हणून अशोक डोंबाळे व सोहेल शेख यांनी काम पाहिले.
दुसऱ्या सामन्यात बिजापूर क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबवर ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नॅशनल क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. मात्र, बिजापूर क्लबने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. बिजापूरच्या आदर्श राठोडने अवघ्या काही चेंडूत १०१ धावांचे झंझावाती शतक ठोकले. त्याला प्रभाकर बी. (२०) आणि मुत्तूर मदार (१४) यांनी साथ दिली. नॅशनल क्लबकडून कैफ शेख आणि इरफान गोलंदाज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात नॅशनल क्रिकेट क्लबचा डाव १७ षटकांत सर्वबाद १२१ धावांवर आटोपला. इस्माईल पीरजादे (२६), कैफ शेख (२१) आणि विजय पवार (२०) यांची झुंज अपुरी पडली. बिजापूरच्या डी. सुमितने अप्रतिम गोलंदाजी करत २५ धावांत ४ बळी टिपले, ज्यात त्याने सलग तीन चेंडूंवर तीन बळी घेत शानदार ‘हॅटट्रिक’ची नोंद केली. शांतेशने २, तर अक्षय, मुथू, विवेकानंद आणि गिरीश यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. शतकवीर आदर्श राठोड याला कुरेशी, सुदेश मालप, विक्रांत पवार, सुनील गादे, राजन म्हेत्रे आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्याचे पंच चिराग शहा आणि महेश सोनवणे होते.
दोन्ही सामन्यांचे गुणलेखन सचिन गायकवाड यांनी केले. या स्पर्धेतील सर्व सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात येत आहेत.
उद्याचे सामने :
- सकाळी परेल मेकॅनिक वर्कशॉप विरुद्ध रॉयल फ्रेंड्स क्रिकेट क्लब
- दुपारी : जय हिंद कुर्डूवाडी विरुद्ध अंबर क्रिकेट क्लब





















