
सोलापूर – मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वाला आपल्या अद्भूत लेखनाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सोलापूर शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. येथील कै. पद्माकर देव सभागृहात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी गडकरी यांच्या अजरामर साहित्यसंपदेचा गौरव करण्यात आला, ज्येष्ठ नाट्यकलावंत सुनंदा शेंडगे यांचा नाट्यपरिषद मुंबईचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे सोलापूर शाखा अध्यक्ष प्रकाश यलगुलवार हे होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, प्रमुख कार्यवाह प्रा. जोतिबा काटे, सत्कारमूर्ती सुनंदा शेंडगे आणि सल्लागार मंडळ सदस्य राजाराजेशचंद्र प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरींच्या साहित्याचा वेध आणि प्रतिमेचे पूजन
कार्यक्रमाची सुरुवात राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर ज्येष्ठ नाट्यकलावंत राजाराजेशचंद्र यांनी गडकरी यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि कार्याचा सविस्तर वेध घेतला. ते म्हणाले:
“राम गणेश गडकरी यांच्या लेखनातील सामाजिक भान, ओघवती भाषाशैली आणि उपरोधिक विनोद आजही वाचकांना खिळवून ठेवतात. मराठी नाट्यसृष्टीला आणि काव्यविश्वाला त्यांच्या लेखनाने एक नवी दिशा दिली. त्यांचे साहित्य आजही नवोदित कलावंतांसाठी तितकेच प्रेरणादायी आहे.” अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या आजीव सदस्य तसेच बालरंगभूमी परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनंदा शेंडगे यांना मुंबई शाखेच्या वतीने ‘नाट्य मंदार’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर शाखेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रंगभूमी आणि इतर सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रकाश यलगुलवार म्हणाले की, “सोलापूर शाखेच्या कर्तव्यदक्ष सभासदाला मुंबई शाखेचा हा मानाचा पुरस्कार मिळणे ही संपूर्ण सोलापूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे आपल्या शाखेची मान उंचावली आहे.”
यावेळी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य व्यंकटेश रंगम, संतोष उदगीर यांच्यासह नक्षत्र कराओके सिंगिंग क्लासचे विद्यार्थी आणि सोलापुरातील चोखंदळ नाट्य-साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















