
सोलापूर – समाजात प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला २७५ कुटुंबांतील तब्बल ५०० नागरिकांचा भव्य सामूहिक वाढदिवस सोहळा सोमवारी सोलापुरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी खासदार ज्योती वाघमारे, ज्येष्ठ समाजसेवक ब्रीजमोहन फोपलिया, नगरसेवक प्रियदर्शन साठे, शहरप्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेविका शैलजा राठोड, शिक्षक नेते वीरभद्र यादवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, वेदमूर्ती बसवराज स्वामी तीर्थ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या सोहळ्यात १ जून रोजी वाढदिवस असलेल्या नागरिकांचा सामूहिक केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विविध शासकीय विभागांत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसांपासून दूर जात असताना अशा उपक्रमांमुळे समाजात जिव्हाळा, प्रेम आणि माणुसकी जपली जाते. प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस सन्मानाने साजरा व्हावा, हीच या उपक्रमामागील खरी भावना आहे.
चाणक्य गुरुकुल आणि बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे समन्वयक काशिनाथ भतगुणकी होते. श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट फॅमिली गार्डन, विजापूर रोड येथे झालेल्या या सोहळ्यात सामूहिक केक सेलिब्रेशन, स्नेहभोजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल आणि पवित्र रोप भेट देऊन वाढदिवसधारकांचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी आणि आपुलकी पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजक प्रकाश राठोड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन युसुफ पिरजादे यांनी मानले.
Post Views: 31