बार्शी – फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचा बनाव करून सर्वसामान्य नागरिकांना अडवून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्यांचा बार्शी तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून, गुन्हा दाखल होताच अनिकेत सुनील रसाळ व ओंकार दीपक परदेशी या दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२७(७), ३०८(२), ३०९(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश विजयराव हावळे (रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) हे १४ जून रोजी त्यांच्या मुलाच्या नावावरील हिरो पॅशन मोटारसायकलवरुन औषधे व इतर कामानिमित्त बार्शीकडे येत होते. दरम्यान, कुसळंब टोलनाक्याजवळील एम.पी. पेट्रोल पंप परिसरात दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.
आरोपींनी संबंधित मोटारसायकलवर फायनान्सचे कर्ज असल्याचे सांगत वाहन जप्त करण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीकडे १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी फिर्यादीने रोख व ऑनलाइन माध्यमातून एकूण १० हजार रुपये दिले. मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही.
इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सुमारे एक तोळे वजनाची सोन्याची अंगठीही जबरदस्तीने काढून घेतली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपींची ओळख पटवून त्यांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपी हे विविध फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिकांना धमकावत पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे कोणाकडूनही फायनान्स कंपनीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली करण्यात आली असेल किंवा अशा प्रकारची घटना घडली असेल, तर संबंधितांनी तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी केले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भालेराव, सहाय्यक फौजदार गवळी, पोहेकॉ. अभय उंदरे, खांडेकर, बोबडे, घाडगे, देशमुख, कावळे पोकॉ. बचुटे, दासरे, लोंढे, चिट्टलवाड यांनी केली आहे.