
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर एकूण ६१५ मतदार(एक मतदार मयत) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नियोजन भवन येथून सहा मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य घेऊन निवडणूक केंद्रावर रवाना झालेले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.
या निवडणुकीसाठी अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख १ जून होती. छाननी २ जून रोजी पार पडली तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ जून होती. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.
या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आयएएस अधिकारी श्रवण पी. हार्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सोलापूर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका व १७ नगरपरिषद/नगरपंचायत अशा एकूण १९ संस्था असून त्यातील मतदारसंख्या ५४४ आहे. याशिवाय ४९ नामनिर्देशित व २३ अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या ६१६ इतकी आहे.या निवडणुकीसाठी एकूण १५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. अंतिमतः २ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व काटेकोरपणे पार पडावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे.






















