
सोलापूर : माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था, वाढेगाव आयोजित “वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धा – २०२५” चा पुरस्कार वितरण सोहळा आज दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन व वृक्षांना पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वैजिनाथ घोगडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदाम भोरे होते. तसेच दिपाली जाधव, वसंत फुले व अमोल तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी स्पर्धेच्या निवड समितीतील प्रा. विजय जाधव, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आणि दत्ता पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तृतीय क्रमांक वासूद अकोला रोड वृक्ष संवर्धन समूह (वासूद), द्वितीय क्रमांक बलवडी ग्रामपंचायत (बलवडी), तर प्रथम क्रमांक पांडुरंग रामचंद्र पाटील (सांगोला) यांनी पटकावला.
याच कार्यक्रमात वृक्षसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रवीण तळे (सोलापूर), डॉ. किशोर वाघमारे, श्री गणेश जाधव यांचा विशेष “वृक्षसेवा सत्कार” करण्यात आला.



















