पंढरपूर – राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मात्र यास वारकरी संघटना व मंदिर महासंघाने विरोध दर्शविला असून पंढरपूर येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात न्यायाधीश राऊत यांच्याकडे या बाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी पूर्ण झाली असून सोमवारी न्यायालय यावर निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे पंढरपूरसह राज्यभरातील वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाला वर्षाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. आलेले भाविक विठ्ठलाचे चरण स्पर्श घेऊन दर्शन घेतात. यामुळे विठ्ठलाच्या चरणाची झीज होत आहे. तसेच विठ्ठल मूर्तीस अभिषेक चालण्यात येत आहे. यामुळे मूर्तीची झीज झाली आहे. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिर समितीने रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यास वारकरी संघटना व मंदिर महासंघ यांनी विरोध दर्शविला असून पंढरपूर येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात या बाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवरची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून यामध्ये वारकरी संघटना व मंदिर महासंघाच्या वतीने येथील अॅड.धनंजय रानडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. या याचिकेवरील सुनावणी वेळी अँड.रानडे यांनी श्री विठ्ठल मूर्ती ही सर्वसामान्य राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशा श्रद्धास्थानावर कुठल्याही रासायनिक प्रक्रिया करू नये, असे सर्वोच न्यायालयाने सांगितले असल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळी न्यायालयाला दिला.
दरम्यान या श्रद्धास्थानाला कुठलाही तडा जाऊ नये, या रासायनिक प्रक्रियेमुळे विठ्ठल मूर्तीची हानी होते आहे.रासायनिक प्रक्रिया केलेल्या मुर्तीवरील अभिषेकाचे जल भाविक तिर्थ म्हणून देखील प्राशन करीत असतात. त्यामुळे हे तिर्थ देखील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक होईल असे देखील यावेळी अँड. रानडे यांनी न्यायालया समोर बाजु मांडताना सांगितले. करवीर पिठाचे शंकराचार्य यांनीही रासायनिक प्रक्रियेला विरोध दर्शवला असल्याचे पत्रही न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले आहे.
दरम्यान सोमवारी (ता.२२) या याचिकेवर न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे रासायसनिक प्रक्रिये संदर्भात न्यायालय कोणता निकाल देणार, याकडे राज्यभरातील तमाम वारकरी भाविकांचे आता लक्ष लागले आहे. वारकरी संघटना व मंदिर महासंघाने विठ्ठल रुक्मिणी मूर्ती रासायनिक लेपन प्रक्रिया न करता आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
———————-
कोट
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी रिस्टोरेशनची
प्रक्रिया पुरातन पुरातन विभागाच्या सूचनेनुसार दिनांक २२ जून ते २४ जून दरम्यान होणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन वारकरी संप्रदायातील विविध संघटना तसेच मान्यवर महाराज मंडळींना देखील याबाबत सूचित करण्यात आले आहे. तरीही काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या; परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला असल्याने पुरातन विभागामार्फत श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती लेपन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
राजेंद्र शेळके ( कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती.)
——————-
कोट
विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने रिस्टोरेशनची (रासायनिक लेपन) प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सुरुवात उद्या २२ जून पासून सुरु केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी दहा नंतर ते बुधवारी २४ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. यामुळे सोमवारी रात्री दहा वाजल्या पासून पुढे दोन दिवस विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर)
—————–
कोट
श्री विठ्ठल मुर्तीच्या वज्रलेपनासाठी रासायनिक प्रक्रियेऐवजी प्राचीन आयुर्वेदीय लेपन केले जावे यासाठी वारकरी संप्रदाय व महाराष्ट्र मंदिर महासंघ आग्रही आहेत. त्यासंदर्भात मंदिर प्रशासनाशी चर्चा निष्फळ ठरल्याने नाईलाजास्तव श्रीविठ्ठल भक्तांच्या वतीने महाराष्ट्र मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयातील काही निकालांचा आधार घेऊन पंढरपूर न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. कोणत्याही हेव्यादाव्याने नव्हे तर विठ्ठल मुर्ती वज्रलेपनाचा कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
पुरुषोत्तम उर्फ गणेश लंके, (कार्यकारिणी सदस्य,महाराष्ट्र मंदिर महासंघ )
Post Views: 11