सोलापूर – आषाढी वारी २०२६ निमित्त लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सोलापूरने व्यापक नियोजन केले असून आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि निवारा यांसह विविध सुविधांचे भक्कम जाळे उभारण्यात आले आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातून १० प्रमुख पालख्या ८१ गावांतून मार्गक्रमण करणार असून त्यांच्यासाठी तब्बल ३८ मुक्काम आणि ४३ विसावा स्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते.
दरम्यान, आषाढी वारी मार्गावर वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ५ हजार शौचालये, ५०० स्नानगृहे, २२० पाणी टँकर, ३७ जर्मन हँगर (वॉटरप्रूफ मंडप ) आणि २३ जर्मन हँगर उभारण्यात येणार आहेत. याशिवाय १६७ हिरकणी कक्ष, ४० स्वागत कमानी आणि १५ मोबाईल चार्जिंग केंद्रांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी १३ मेडिसीन ऑन व्हील सेवा कार्यरत राहणार आहेत. तसेच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ७५० चरणसेवा फूट मसाजरची व्यवस्था करण्यात आली आहे. वारी मार्गावरील स्वच्छता राखण्यासाठी ५०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत तुकाराम महाराज (देहू), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत सोपानकाका (सासवड), संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत एकनाथ महाराज (पैठण), संत गजानन महाराज (शेगाव), श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान (कोल्हापूर), संत चांगदेवेश्वर (सासवड) आणि संत निळोबाराय (पिंपळनेर) अशा दहा प्रमुख पालख्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
प्रशासनाने केवळ धार्मिक सोहळा म्हणून नव्हे तर ‘सेवा, स्वच्छता आणि सुरक्षितता’ या त्रिसूत्रीवर भर देत नियोजन केले आहे. वारी मार्गावरील पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, निवारा आणि डिजिटल सुविधांमुळे लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद आणि प्रशासनाने उभारलेली ही सुविधा व्यवस्था राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरणार असल्याचे मानले जात आहे.
कोट
सुरक्षित सुशिक्षित आणि सुखकर वारीसाठी प्रयत्न
जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी सदस्य अधिकारी वारीच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. मोबाईल चार्जिंग व्हॅन, फिरते वैद्यकीय वाहने, महिला सभागृह, हिरकणी कक्ष, उपचार केंद्र अशा सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. वारकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार व उपयुक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आहे.
– दीपक वैद्य,अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
कोट
आषाढी वारीसाठी सर्व नियोजन अंतिम टप्प्यात
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील ३,७९७ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यामध्ये ४४० तज्ञ वैद्यकीय अधिकारी, ४२५ कर्मचारी त्याचप्रमाणे आशा वर्कर आणि इतर कर्मचारी देखील कार्यरत असणार आहेत. सोलापूर सह इतर जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर्स वारी निमित्ताने सोलापुरात मुक्कामाला असणार आहेत. याशिवाय काही संस्थांकडून सी.आर.एस फंडातून २० लाख औषधे किट प्राप्त केली जाणार आहेत. शासनाकडून वारकऱ्यांसाठी विमा योजना केली जाणार आहे. साधारणपणे ३० ते ३५ लाख वारकरी येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार वारीचे नियोजन केले आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
कोट
वारीच्या अनुषंगाने सर्व निविदा अंतिम टप्प्यात
आषाढी वारीच्या अनुषंगाने शासनाकडून एकूण ६३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे डीपीसी मधून एक कोटी प्राप्त झाले आहेत. नियोजित आणि अनियोजित रस्त्यांच्या विकासासाठी अनुक्रमे दीड कोटी आणि साडेतीन कोटीचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये पालखी मार्ग दुरुस्तीचा आढावा घेतला जाणार असून, कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. आषाढी वारीच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व कामांची निविदा अंतिम टप्प्यात आहे.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 25