सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते बुधवारी जिल्हा परिषदेत एकाच वाहनातून दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी एकत्रितपणे जिल्हा परिषदेत हजेरी लावल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
सध्या अक्कलकोटच्या राजकारणात सिद्धाराम म्हेत्रे हे शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत, तर मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी दोन्ही नेते एकाच गाडीतून जिल्हा परिषदेत दाखल झाल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेत आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या दालनात भेट दिली. काही काळ तेथे चर्चा सुरू होती. या चर्चेचा नेमका विषय काय होता, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी त्यांच्या भेटीने अनेकांच्या उत्सुकता वाढवल्या. चर्चेदरम्यान सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसेच शिक्षणाधिकारी कादर शेख हे देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे चर्चा संपल्यानंतर दोन्ही नेते पुन्हा एकाच वाहनातून रवाना झाले. वाहनाचे स्टेअरिंग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्याकडे होते. त्यामुळे या भेटीला केवळ शिष्टाचार भेट म्हणायचे की त्यामागे काही राजकीय समीकरणांची नांदी आहे, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना विचारणा केली असता त्यांनी “सहज आलो… चहा पिण्यासाठी आलो होतो,” असे मिश्कील उत्तर दिले. मात्र, अक्कलकोटच्या राजकीय पटावर प्रतिस्पर्धी पक्षांतील दोन नेत्यांचा हा एकत्रित प्रवास आणि जिल्हा परिषदेत झालेली भेट यामुळे तालुक्यात नव्या राजकीय चर्चांना चांगलेच खतपाणी मिळाले आहे.
चौकट
‘चहाची भेट’ की नव्या समीकरणांची चाहूल?
सिद्धाराम म्हेत्रे आणि मल्लिकार्जुन पाटील यांच्या एकत्रित भेटीमागे केवळ प्रशासकीय कामकाज होते की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे, याची उत्सुकता आता अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
Post Views: 18