पंढरपूर – नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपली यशाची चढती कमान तशीच वाढवत ठेवली.प्रशालेचा गुणवंत अष्टपैलू विद्यार्थी चिरंजीव अथर्व अमित वाडेकर व चि.सार्थक सिद्धेश्वर लेंगरे हे शंभर टक्के गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेले आहेत. कु.सान्वी सचिन कलढोणे, कु.धनश्री लिगाडे, कु.सई तेंडुलकर यांच्यासह ३६ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
संस्कृत, गणित, विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळवून विद्यार्थ्यांनी स्वतःची हुशारी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांना पारंपारिक हलगी वाद्याच्या गजरात त्यांना प्रशालेमध्ये वाजवत आणले. ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले ३६ विद्यार्थ्यांना वाजत – गाजत रेड कार्पेट वरुन फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
प्रारंभी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संचलित इंग्रजी परीक्षेत राज्यस्तरीय यश मिळवल्याबद्दल इयत्ता आठवी मधील कुमारी मृण्मयी वहील हिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावीच्या मार्च २०२६ बोर्ड परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या ३६ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चिरंजीव अथर्व अमित वाडेकर याने एक वेगळी भावस्पर्शी घोषणा केली. त्याला बक्षीस म्हणून मिळालेले रुपये दहा हजार त्याने संस्थेमध्ये दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळावे म्हणून दिले.
दरम्यान एवढ्या लहान वयात असलेला दानशूरपणा संस्काराचाच एक भाग आहे असे मत पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव गुरुवर्य पटवर्धन सरांनी व्यक्त केले.आपल्या मनोगतात त्यांनी पालकांना आवाहन केले की विद्यार्थ्यांवर तुम्ही कोणत्याही प्रकारची निर्णय लागण्याची जबरदस्ती करू नका. आम्ही आमच्या प्रशालेत सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्य विकसित करणारे वर्ग सुरू केलेले आहेत. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकांना व विद्यार्थ्यांना केले .संस्थेचा कोणताही विद्यार्थी जीवनाच्या लढाईमध्ये यशस्वी व्हायला पाहिजे असे संस्कार आम्ही आमच्या शाळेतून देतो व उत्तम नागरिक घडवतो असे पालकांना सांगितले.
मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पुढील वर्षी अजून जास्त विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण पाडून यशस्वी व्हा आम्ही तुमचा अजून जोरदार सत्कार करतो. कार्यक्रमाचं आभार व्यक्त करताना उपमुख्याध्यापिका सौ. विश्वासे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पालकांचे त्यांच्या या गुणांबद्दल कौतुक व्यक्त केले. पारितोषिक वाटप करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर, मानद सचिव सुधीर पटवर्धन, संस्था सदस्य डॉक्टर मिलिंद जोशी, संजय कुलकर्णी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणी लेंगरे, कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर.एस.कुलकर्णी, एस.एम.कुलकर्णी, अपर्णा आयाचित विद्यार्थ्यांचे कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक राजेश खिस्ते यांनी केले.पारितोषिक वाचन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक समीर दिवाण यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक श्री.शेलार, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत मोरे, संतोष पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले.विद्यार्थ्यांना पुढील जीवनात शुभेच्छा देऊन यशस्वी होण्याचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थी आनंदी होऊन घरी गेले.
——————
चौकट : टार्गेट पब्लिकेशन तर्फे गेस युवर मार्क ही स्पर्धा आयोजित केली होती. परीक्षा सुरू व्हायच्या आधी तुम्हाला किती मार्क पडतील हे त्यांना कळवायचे होते. अमित वाडेकर यांनी सुरुवातीलाच आपल्याला शंभर टक्के पडणार असे कळवले व त्याप्रमाणे मार्क पाडून दाखवले आणि मिळालेले बक्षीस विद्यार्थ्यांमध्येच पुन्हा मिळावे म्हणून शाळेत दिले.
Post Views: 11