
सोलापूर – येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार यांना महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला आहे. १ जुलै रोजी मुंबई येथे राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ४४ हजार रुपयाचा धनादेश व स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
बिराजदार यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून शेती व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. तूर पिकामध्ये प्रति एकर १६ क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी विशेष यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीची दखल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि अचूक पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी पाण्याची बचत आणि उत्पादनवाढ साध्य केली आहे. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यांचा प्रभावी वापर करून दुष्काळी परिस्थितीतही पिकांची उत्पादकता टिकवून ठेवली.
बिराजदार यांनी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून जमिनीची सुपीकता आणि पीक गुणवत्तेत वाढ घडवून आणली. निंब अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, स्लरी यांसारख्या जैविक घटकांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे . द्राक्ष पिकातून उच्च दर्जाच्या बेदाणा उत्पादनाचा यशस्वी प्रकल्प उभारून त्यांनी मूल्यवर्धनाला चालना दिली. उत्कृष्ट दर्जाचा बेदाणा तयार करून बाजारपेठेत सर्वोच्च दर मिळविण्यात यश मिळवले आहे.
अलीकडेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित १० दिवसांच्या इस्राईल आंतरराष्ट्रीय शेती अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊन त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, संरक्षित शेती आणि मूल्यवर्धन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला आहे.
निंबर्गी अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ची स्थापना करून परिसरातील शेतकऱ्यांना संघटित केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी निविष्ठा, उत्पादन विक्री, बाजारपेठ उपलब्धता आणि मूल्यवर्धन यासाठी प्रभावी कार्य सुरू आहे. शेती क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी शेतकरी मेळावे, कृषी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच महिला बचत गटांना सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले आहे. गेल्या १४ वर्षांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तब्बल १ हजार ४८७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतःच्या खर्चातून सायकली वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शेती, मूल्यवर्धन, शेतकरी संघटन, जलव्यवस्थापन आणि सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२४ जाहीर केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

















