सोलापूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी दाराशा हॉस्पिटल येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा स्वयंसेविका तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर विनायक कोंडयाल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिकेने शहरभर लसीकरण केंद्रे आणि फिरती पथके कार्यरत केली असून नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर तसेच फिरत्या पथकांच्या माध्यमातून पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि संबंधित यंत्रणा कार्यरत असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय आरोग्य अभियानात सर्व पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
—
Post Views: 13