
सोलापूर – शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हा शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धामध्ये शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील सोलापूर ग्रामीण (माढा) संघाने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
पोद्दार शाळेजवळील चैत्राली हॉल येथे झालेल्या या स्पर्धेत येथील संदीप गायकवाड (मेहता प्रशाला, सोलापूर) यांच्या संघाने द्वितीय, किशोर चंदनशिवे (यशोधरा प्रशाला) यांच्या संघाने तृतीय, तर भास्कर देडे (संत तुकडोजी महाराज आश्रम प्रशाला) यांनी चतुर्थ पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका अश्विनीताई चव्हाण आणि ऑल इंडिया जीत कुने डो फाउंडेशनचे उपाध्यक्ष ग्रँडमास्टर युवराज गायकवाड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण असोसिएशनचे सहसचिव तथा उद्योगपती यशवंत इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या वैष्णवी गोविंद चव्हाण, साक्षी श्रीशैल बिदनुरे आणि शर्वरी विकास गुरव या विद्यार्थिनींचा ‘बेस्ट फायटर ट्रॉफी’ देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास टेक्निकल डायरेक्टर मास्टर किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, आनंद जाधव तसेच असोसिएशन ऑफ जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स, सोलापूरचे जिल्हाप्रमुख अभिजीत गायकवाड उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख अभिजीत गायकवाड यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मास्टर अनुराग देडे, संदीप गायकवाड, नागेश कांबळे, सुमित पाटील, विश्वजीत गायकवाड, सुनील बरगोदीया, शिशुपाल चंदनशिवे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असोसिएशनचे सचिव सम्राट गायकवाड व महाराष्ट्र राज्य प्रमुख मिलिंद काटमोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.























