मंगळवेढा – मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरोघरी महिलांनी भारतीय संस्कृतीमधील वटपौर्णिमेचा सण वडाच्या झाडाची पुजाअर्चा करुन सात फेर्या मारुन जन्मोजन्मी हाच पती मिळो व त्याला दिर्घायुष्य लाभो अशी मनोभावे प्रार्थना सौभाग्यवती महिलांनी केली.
यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमेचा सण आला असून या पार्श्वभूमीवर घरोघरी महिलांनी घराची स्वच्छता करुन घराच्या अंगणात वटवृक्षाचे झाड रांगोळीच्या माध्यमातून काढल्याचे चित्र होते. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी एका अत्यंत पवित्र आणि महत्वाच सण मानला जातो. या दिवशी पतीच्या दिर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी महिला वर्ग वडाच्या झाडाची विधीवत पुजा करतात. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जीवंत झाला ते झाड वडाचे होते. सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे पुजा केली व या प्रसंगाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी सौभाग्यवती वडाच्या झाडाची पुजा करण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. शहरातील व ग्रामीण भागातील सौभाग्यवतीने अंगावरती हिरवा शालू,हिरव्या बांगड्या,भांगात सिंदूर,कपाळावर कुंकवाचा टिळा, वेणीत मोगर्याचा गजरा,गळ्यात व नाकात विविध सोन्याचे दागिने परिधान करुन वडाच्या झाडाला पुजण्यासाठी श्री संत दामाजी मंदिराकडे महिला जात असल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या पुरातन वडाच्या झाडाला पुजण्यासाठी ब्रम्हपुरी,माचणूर,रहाटेवाडी,मुंढेवाडी,बेगमपूर व अन्य गावातून महिलांनी येवून मनोभावे पुजा केली. यावेळी महिलांनी सुपली,करंडा,फणी,आरसा,नारळ,कापड,गव्हू,हळदी कुंकू,आंबे आदी वाण पुजेसाठी ठेवून मनोभावे दर्शन घेतले. तद्नंतर सुहासिनी महिलांनी उपस्थित असलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून एकमेकींना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 7