सोलापूर : महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती उमेदवार निवडीची प्रक्रिया ही पक्षातील सर्व पदाधिकारी, महापौर, शहराध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्यांना विश्वासात घेऊन सामूहिक निर्णयातून पार पडली असून, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या नगरसेवकांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना काळे म्हणाले की, विषय समित्या केवळ अस्तित्वात राहण्यासाठी नव्हे, तर प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांची नियमित बैठक होणे आवश्यक आहे. समित्यांमधील अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक निधी किंवा निर्णयासाठी विषय सभागृहाकडे पाठविण्यात यावेत, या उद्देशाने समित्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व समित्यांचे काम अधिक परिणामकारकपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभापती निवडीत मध्य आणि दक्षिण भागाला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याच्या प्रश्नावर काळे यांनी तो आरोप फेटाळून लावत, शहर उत्तर भागातील नगरसेवकांनाही प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे स्पष्ट केले. सातच विषय समित्या असल्याने मर्यादित संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभापती निवडीसाठी कोणतेही ठरावीक किंवा इतर प्रमाण ठेवले नसून, चांगले कार्य करणाऱ्या नगरसेवकांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व नगरसेवक सक्षम असले तरी प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने संधी दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.सभागृह नेते म्हणून निवड प्रक्रियेत स्वतःचा प्रभाव असल्याचा आरोपही त्यांनी नाकारला. ही संपूर्ण प्रक्रिया महापौर, शहराध्यक्ष आणि पक्षातील सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक निर्णयातून पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवख्या नगरसेवकांना संधी देण्याबाबत बोलताना काळे म्हणाले की, काम करण्याची संधी दिल्याशिवाय त्यांची क्षमता समोर येत नाही. त्यामुळे काही अनुभवी नगरसेवकांना थांबवून नव्या चेहऱ्यांनाही जबाबदारी देण्यात आली असून, पुढील काळात सर्वांना संधी मिळेल.
Post Views: 16