पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित, नाथ चौक येथील कवठेकर प्रशालेला नुकताच सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे-सोलापूर यांच्यावतीने मानाचा ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ पुरस्कार माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांना नुकताच शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.याबद्दल या गौरव सोहळ्याचे आयोजन कवठेकर प्रशालेत अत्यंत उत्साहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाला. त्यांनी आपल्या मनोगतात शाळेची शैक्षणिक वाटचाल आणि राबविले जाणारे विविध उपक्रम यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक ह.भ.प.गोरोबा काका होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रशालेच्या कार्याचा व विदयार्थी केंद्रित धोरणामुळे हे यश मिळाल्याचे स्पष्ट केले. तर प्रमुख अभ्यागत म्हणून पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र. पटवर्धन यांनी प्रशालेने अंगीकारलेली शिस्त, संस्कार व उत्तम नियोजनाचे हे फलीत असल्याचे नमूद करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या पुरस्काराद्वारे शाळेने शैक्षणिक क्षेत्रात केलेले पवित्र कार्य आणि उद्याच्या समृद्ध जीवनासाठी विद्यार्थ्यांवर केलेले सुसंस्कारांचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. शाळा आपल्या शैक्षणिक वाटचालीतून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवत असल्याचे या सन्मानाद्वारे स्पष्ट झाले असून, शाळेच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. गडदे,प्रशालेतील सर्व शिक्षक बंधु भगिनी,पालक व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मेडशिंगकर यांनी केले.
Post Views: 10