सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे आयोजित करण्यात येणारे २३ वे ‘पीडीजी के. भोगिशयाना स्मृती व्याख्यान’ मंगळवार दि. १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे. यावर्षीचे प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर उपस्थित राहणार असून, ते राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष मितेश पंचमिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे व्यक्तिमत्त्व आणि माजी कुलगुरू स्वर्गीय पीडीजी के. भोगिशयाना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २३ वर्षांपासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. शिक्षण, समाजसेवा आणि रोटरीमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. प्रा. डॉ. सुहास पेडणेकर हे डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू असून, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिक्षक, संशोधक आणि प्रशासक म्हणून त्यांना चार दशकांहून अधिक अनुभव आहे. सेंद्रिय रसायनशास्त्रातील संशोधन, पीएच.डी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाध्यक्ष केशव वळसे हे आहेत.
या व्याख्यानमालेत यापूर्वी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, भारताचे माजी सरन्यायाधीश ॲड. उदय लळित, ह.भ.प. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज तसेच संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांसारख्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव कॅप्टन पार्थ दावडा यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत जुबीन अमारिया, विलास कोले, शिवाजी उपरे आदी उपस्थित होते.
Post Views: 15