सोलापूर – ७९व्या सिनियर नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये येथील श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकासह ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च बहुमान पटकावला आहे.

चेन्नई येथील एस.आर.एम. विद्यापीठाच्या डॉ. टी. पी. पारिवेंधर एक्वेटिक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी श्रावणीने ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात तिने १६६.२० गुण मिळवत महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्ण पदक निश्चित केले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात श्रावणीने १८६.५० गुणांची कमाई करत रौप्य पदक आपल्या नावावर केले. आजवरची उत्कृष्ट कामगिरी आणि या राष्ट्रीय स्पर्धेतील या दोन पदकांच्या जोरावर तिला स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ ची प्रतिष्ठित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
——–
महाराष्ट्राला सांघिक उपविजेतेपद
श्रावणीने मिळवलेल्या या दोन पदकांमुळे महाराष्ट्राला “डायव्हिंग वूमन ओव्हरऑल रनर्स” (सांघिक उपविजेतेपद) ही टीम ट्रॉफी मिळवण्यात यश आले. महाराष्ट्राला हे सांघिक यश मिळवून देण्यात श्रावणीचा वाटा अत्यंत मोलाचा ठरला. तिला आंतरराष्ट्रीय कोच श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

















