सोलापूर – सोलापूर शहरातील मैदानावर उन्हाळी शिबिराच्या समारोप प्रसंगी क्रिकेटच्या मैदानावरील सुरक्षा साधनांप्रमाणेच दैनंदिन जीवनात रस्त्यावर प्रवास करताना हेल्मेट वापरणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. क्रिकेटमध्ये जशी स्वतःच्या रक्षणासाठी खबरदारी घेतली जाते, तशीच खबरदारी रस्त्यावरही घेतली पाहिजे, असे प्रतिपादन महामार्ग सुरक्षा पथक पाकणीचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी केले.

विहान क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर समारोपप्रसंगी ते बोलत होते. खेळाडू व पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी “सेफ रोड, सेफ व्हेईकल, सेफ ड्रायव्हर’चा (सुरक्षित रस्ता, सुरक्षित वाहन, सुरक्षित चालक) हा महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले, ”वेळेचे महत्त्व ओळखा आणि शिस्त पाळा. आपल्याला जे एवढे सुंदर मैदान मिळाले आहे, त्यावर मनापासून मेहनत करा; त्याचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पालकांनाही आपल्या मुलांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि खेळाडूंच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशेषतः टिळक सरांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, वयाच्या ८१व्या वर्षीही सर रोज एखाद्या तरुणाच्या उत्साहाने मैदानावर हजर असतात, हा आदर्श सर्वांनी समोर ठेवावा.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अशोक टिळक, माजी रणजीपटू प्रवीण देशेट्टी, योगेश कोंपल, प्रशांत बाबर आदी उपस्थित होते.
——–
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कार्यक्रमादरम्यान, तरुण खेळाडूंना आणि पालकांना संबोधित करताना स.पो.नि. जीवन निरगुडे यांनी स्पष्ट केले की, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक नागरिकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे कर्तव्य मानले पाहिजे. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर हा फॅशन किंवा दंडापासून वाचण्यासाठी नसून स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी आहे, हे त्यांनी क्रिकेटमधील सुरक्षा साधनांचे (उदा. हेल्मेट, पॅड्स) उदाहरण देत अतिशय सोप्या शब्दांत पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची शपथ घेतली. हा अनोखा उपक्रम खेळाडू आणि पालकांसाठी अत्यंत प्रबोधनपर ठरला.
Post Views: 28