बार्शी – दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर सायकलिंग वारी २०२६ दि. १२ जुलै रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या भव्य सायकलवारीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ४,५०० सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बार्शी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत (बप्पा) बारबोले यांच्या नेतृत्वाखाली क्लबचे २१ सायकलपटू दि. ११ जुलै रोजी बार्शी येथून सायकलने पंढरपूरकडे प्रस्थान करुन सुरक्षितपणे पंढरपूर येथे पोहोचले. त्यानंतर दि. १२ जुलै रोजी आयोजित मुख्य सायकलवारीमध्ये सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विठ्ठल भक्ती, शिस्त आणि फिटनेसचा संदेश दिला.
यावेळी पंढरपूर सायकल वारी ग्रुप यांच्यावतीने आयोजित ‘६०दिवस सायकलिंग चॅलेंज’ यशस्वीरित्या पूर्ण करणारे बार्शी सायकलिंग क्लबचे सायकलपटू विनोद उर्फ भैया बुडूख व अमृत खेडकर यांचा विशेष सत्कार करुन गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट सहभाग, शिस्तबद्ध नियोजन आणि सातत्यपूर्ण सायकलिंग संस्कृतीचा प्रसार केल्याबद्दल बार्शी सायकलिंग क्लबचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल बार्शी सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी काळातही अधिकाधिक नागरिकांनी सायकलिंगचा स्वीकार करुन निरोगी जीवनशैली जोपासावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
Post Views: 11