माढा : संपुर्ण महाराष्ट्रभर आषाढी वारीची लगबग चालू आहे. लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत त्याच पार्श्वभूमीवर माढा जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणारी ‘बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये ‘ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मुलींनी सहभाग घेतला.
इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषेत, हातात टाळ, भगवे ध्वज आणि मुखी “ज्ञानोबा-तुकाराम पांडुरंग हरी ” असा अखंड जयघोष करत शाळेपासून शहरातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचे मार्गक्रमण केले. याप्रसंगी संपूर्ण माढा शहर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालखीचे पूजन मुख्याध्यापक सुरेश माळी,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वर्षा गायकवाड,अनिकेत चवरे, देविदास खरात, सागर भांगे, गिरीश कानडे गौरी कानडे तसेच उपस्थित महिला पालकांच्या शुभहस्ते करण्यात आले.
टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अभंगांच्या गजरात नाचत-गात निघालेली ही दिंडी माढा शहरातील इंदिरा गांधी चौकात पोहोचली. येथे पारंपरिक रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थिनींनी अभंगांवर नृत्याविष्कार, फुगडी सादर केला. सामाजिक प्रबोधनपर नाटिका समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला.
या बाल दिंडी साठी संपूर्ण वेशभूषा व सजावट शाळेतील शिक्षिका नूतन कानडे, रेविता लोखंडे,सुनीता उबाळे, स्वाती घावटे यांनी केली,तांत्रिक सहाय्य शाळेतील शिक्षक प्रवीण भांगे व चारुदत्त आष्टेकर ,दत्तात्रय घुमरे यांनी केले. शाळेमध्ये विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन विनोद परिचारक आभार स्वाती घावटे यांनी मानले.
Post Views: 15