सोलापूर – ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना वेळेत आणि मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संबंधित परिसरातील उपलब्ध सोनोग्राफी केंद्रांशी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समन्वय (टाय-अप) करून प्रत्येक गरोदर महिलेला आवश्यक तपासणी वेळेत मिळावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिल्या.
आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, उपलब्ध सुविधा, सेवांमधील अडचणी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा झाली.
बैठकीत ग्रामीण नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक आरोग्य उपकेंद्र नियमितपणे कार्यरत ठेवून नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यावरही भर देण्यात आला.
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना अखंड आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सभेत विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी अभिनंदनाचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, सविता कोकाटे, सोनाली कडते, करुणा शिवशरण, प्रशांत कडते, जनार्दन शिवशरण, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.