सोलापूर – येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडास्पर्धामध्ये सहभाग नोंदवून यश प्राप्त करणाऱ्या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने पालकांसह सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
प्रारंभी विद्येची आराध्यदेवता सरस्वती देवीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगून सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी यशापयशाची चिंता न करता विविध स्पर्धा परीक्षा द्याव्यात
असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नसतात तर त्या वेगळेपणाने करतात याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचा वापर करून नाविन्य निर्मिती करावी अशी आशा त्यांनी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली. यानंतर भारत टॅलेंट सर्च परीक्षा तसेच डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश मिळवून इस्त्रो सहलीसाठी निवड झालेला प्रतीक काकडे, इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेली अक्षता धसाडे, एनएमएमएस परीक्षेत पात्र ठरलेला अंशुक कांबळे, प्रज्ञा परीक्षेत यशसंपादन करणारा कार्तिक भागवत, इंडियन टॅलेंट ऑलम्पियाड स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक मिळवणारा आयान तांबोळी, आठवा क्रमांक संपादन करणारी श्रावणी कोंडुभैरी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच प्रशालेतून मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, एमटीएस ऑलंपियाड, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, प्रज्ञा परीक्षा, संस्कृत स्कॉलरशिप परीक्षा, गणित संबोध प्राविण्य व प्रज्ञा परीक्षा व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करून स्वतःच्या व प्रशालेच्या यशात मानाचा तुरा रोवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडात यशस्वी विद्यार्थ्यांना दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी बेळळे यांनी,बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन जयश्री आगरखेड यांनी तर आभार अनुप कस्तुरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे,अभिनंदन उपाध्ये, अभिजित पाटील, विक्रांत बारडकर, ऋषभ सोनटक्के सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.