सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील नालेसफाई कंत्राटातील कथित भ्रष्टाचार आणि २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणूक खर्चाच्या बिलातील कथित अनियमितता या दोन प्रकरणांमुळे महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी पूर्ण होईपर्यंत नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवावे, अशी मागणी भाजपच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , अनंत जाधव यांच्यासह विविध विषय समित्यांच्या सभापती आणि तब्बल २२ नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाई कंत्राटातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवावे, अशी भूमिकाही त्यांनी सभागृहात मांडली होती. त्यानंतर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे.
दरम्यान, २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणूक खर्चाच्या बिलांबाबतही भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविले आहेत. स्थायी समितीने सुरुवातीला संबंधित बिलांना मंजुरी नाकारली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ही बिले मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येत असल्याने नगरसेवकांनी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, अर्चना वडनाल ,मंजिरी किल्लेदार, सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह निवडणूक खर्चा संदर्भात अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. पहिल्यांदा मंजुरी नाकारण्यामागील कारणे, त्यानंतर करण्यात आलेल्या दुरुस्त्या, प्रशासकीय व आर्थिक मंजुरी, शासन नियमांचे पालन, कार्यादेश, करारपत्रे, देयके, मोजमाप पुस्तिका, व्हाउचर्स, उपस्थिती नोंदी, वित्त व लेखा विभागाचा अभिप्राय तसेच अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी नगर अभियंत्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर ठेवणे आवश्यक असल्याचा आग्रह भाजपच्या नगरसेवकांनी धरला आहे.उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका मंजिरी किल्लेदार, अर्चना वडनाल यांच्यासह नगरसेवकांनी मागणीची दखल न घेतल्यास महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, निवडणूक खर्चा संदर्भात बुधवारी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेतील हे दोन्ही प्रकरण आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना संबंधित अधिकारी पदावर राहणे योग्य नाही यामुळे नगर अभियंता यांना तोपर्यंत पदावरून दूर ठेवण्यात यावे अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, त्यांना रुजू करून घेणार नसल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे असे नगरसेवक अनंत जाधव यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना आज निवेदन देतेवेळी नगरसेवक अनंत जाधव , समिती सभापती सत्यजित वाघमोडे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील समाधान आवळे, संजय कोळी, वंदना गायकवाड, मंजिरी किल्लेदार, महेश देवकर, संकेत किल्लेदार, किरण पवार अजित गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
—-
Post Views: 29