सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना ऐतिहासिक सर्वेक्षण करताना मेईदेव राजाचा शिलालेख आढळून आला आहे त्यामुळे तीर्थ गावाच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे
तीर्थ येथे अणवेकर यांना सापडलेल्या शिलालेखातील मजकूर एकूण अवघ्या दोन ओळींचा असून शिलालेख मराठी भाषेत आहे. शिलालेखाच्या शिळेवर डाव्या भागात खालच्या बाजूस गंडभेरुंडासारखी दिसणारी दोन तोंडांची मानवी आकृती कोरलेली आहे. अक्षरवटिकेवरून शिलालेखाचा काळ साधारणतः चौदावे शतकातील आहे
तीर्थ येथे शिलालेख सापडतात अणवेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन पुण्यातील इतिहास अभ्यासक अथर्व पिंगळे यांच्याकडे वाचन करण्यासाठी पाठविले त्यांनी शिलालेखाचे वाचन केले त्यानुसार
शिलालेखावर
१. र्द श्री अरुवतबडिचा रा-
२. णा मेईदेवाचे व्रीती असे कोरलेले आहे
शिलालेखाची सुरुवात र्द या मंगलवाचक अक्षराने झाली आहे. तीर्थ गावाचे प्राचीन नाव एक्करुक तीर्थ असे होते चालुक्यकालीन शिलालेखात देखील तसा उल्लेख आलेला आहे त्या काळी तीर्थ गावाचा समावेश कुंबरिगावे अरवत्तुबाड म्हणजेच कुंभारी विभागात होत असे
शिलालेखात उल्लेख केलेला मेईदेव या शासकाचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे तो कुंभारी विभागातील ६० गावाचा शासक होता देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रावर दिल्ली सुलतानाची सत्ता आली मात्र मुहम्मद तुघलकाच्या अखेरच्या काळात दक्षिणेतील सुलतानाचे शासन कमकुवत झाले त्याचा फायदा घेऊन स्थानिक सामंत स्वतंत्र झाले मेईदेव याने देखील याच संधीचा फायदा घेऊन कुंभारी च्या साठ गावावर सत्ता प्रस्थापित केली मेईदेवाने केलेल्या भूमिदानाचा उल्लेख सुद्धा प्रस्तुत शिलालेखात आला आहे. अलाउद्दीन हसन बहमनशाह याचा सेनापती कुत्ब उल मुल्क याने अक्कलकोट आणि मुरुम हे प्रदेश जिंकल्यानंतर मेईदेवाची सत्ता संपुष्टात आली असे विधान समकालीन इतिहासकार ईसामी यांनी केले आहे.