सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २५७ पैकी सध्या कार्यरत असलेल्या २०१ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्यातील सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
शहराची हद्दवाढ झाल्यानंतर १९९५ मध्ये
महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे आरोग्य, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि उद्यान विभागात मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी सेवकांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती आदेश नसतानाही हे कर्मचारी संबंधित विभागांत नियमितपणे कार्यरत होते.याप्रकरणी महापालिकेने १९९५ मध्ये उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यापूर्वीचे रोजंदारी सेवक सामावून घेतल्याशिवाय नवीन रोजंदारी भरती करणार नसल्याचे नमूद केले होते. मात्र त्यानंतर विविध विभागांत सक्षम मान्यतेशिवाय कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले. महापालिकेने विविध विभागांकडून माहिती संकलित करून २५७ सेवकांची यादी तयार केली होती. यातील मृत, सेवानिवृत्त, दीर्घकाळ गैरहजर तसेच न्यायालयीन आदेशानुसार कायम झालेले कर्मचारी वगळल्यानंतर सध्या २०१ कर्मचारी कार्यरत आहेत.
रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्ताव सभेपुढे ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मागील सर्वसाधारण सभेत विषय न आल्याने संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. आता अखेर स्थायी समितीपुढे प्रस्ताव आल्याने या कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर शासनस्तरावरही यापूर्वी चर्चा झाली असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. विविध लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. आता स्थायी समिती आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यास प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिकेवर ७.२५ कोटींचा भार
सेवेत कायम केल्यानंतर २०१ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकेला ७ कोटी २५ लाख ७७ हजार २४८ रुपये खर्च करावा लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय झाल्यास महापालिकेच्या वेतन खर्चात वाढ होणार आहे.
ठळक मुद्दे असे —
– २५७ पैकी २०१ कर्मचारी कार्यरत
– मनपा स्थायीपुढे आला प्रस्ताव
– ऑगस्टमध्ये सर्वसाधारण सभेची मंजुरी
– १९९५ पासून प्रश्न प्रलंबित
– कायमनंतर ७.२५ कोटींचा वेतनभार
——-
Post Views: 19