सोलापूर : अस्तित्व मेकर्स फाउंडेशनतर्फे आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक २०२६ राज्यस्तरीय लघुनाटिका हास्य प्रहसिका स्पर्धेत लातूरच्या ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राच्या ‘आधुनिक बालकीर्तन’ या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. हुतात्मा स्मृती मंदिर येथे शनिवारी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ संघांनी सहभाग घेतला.
कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि विनोदाची प्रभावी सांगड घालत बालकलाकारांनी सादरीकरण केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. द्वितीय क्रमांक दि अविरंग क्रिएशन, सोलापूरच्या ‘काहीतरी राहिलय’ला, तर तृतीय क्रमांक अलकाश थिएटर, सांगलीच्या ‘कोती डिबेट’ला मिळाला.
दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘आधुनिक बालकीर्तन’चे दिग्दर्शक नवलाजी जाधव, द्वितीय राजू गायकवाड आणि तृतीय शिवप्रसाद चिक्का यांना मिळाले. पुरुष अभिनयात शंतनू देढे, विनोद आवळे व रमेश श्रावण, तर स्त्री अभिनयात पायल जाधव, सई दरेकर व अपर्णा पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, हास्यजत्रा फेम मुकेश जाधव व ज्येष्ठ नाट्यकर्मी सुनील गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सुहासिनी शहा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. त्यांनी अस्तित्व फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष डॉ. किरण लोंढे यांच्यासह आयोजकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Post Views: 44