मंगळवेढा – शहराजवळून जाणार्या कालव्याचा भाग मुरुम टाकून बंधिस्त करुन त्यावर रस्ता करुन शेतकर्यांना दिल्या जाणार्या पाण्याच्या वितरण प्रणालीस अडथळा करुन 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे शासकीय नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तेजस चव्हाण हे भीमा पाटबंधारे शाखा क्रमांक 1 कडे शाखाधिकारी म्हणून कार्यरत असून दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास फिर्यादी व उपविभागीय अभियंता एन.ए.जडे,कालवा निरीक्षक डी.एन.सलगर आदी मंगळवेढा शहरानजीक असलेल्या शेजजमीन गट क्रमांक3204 व गट क्रमांक 3205 मधील संपादीत क्षेत्रातील कालव्याचे 80 मिटर लांबी पर्यंत मुरुम टाकून कालव्यात पाईप ठेवून रस्ता बनवून शेजारी प्लॉटींग चालू असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले. सदरच्या कालव्यात कोणी तरी अज्ञात व्यक्तीने प्लॉटींगकडे जाण्यासाठी रस्ता बनवला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे हे करीत आहेत. दरम्यान कालव्यानजीक काही इसमांनी प्लॉटींग पाडून लाखो रुपये कमवण्याचा गोरखधंदा सुरु केला असून या प्लॉटींगकडे जाण्यासाठी चक्क शेतकर्यांच्या शेतीला कॅनॉलव्दारे जाणारे पाणी अडवून कॅनॉल मध्ये मुरुम भरुन रस्ता केल्याचे विदारक चित्र येणार्या जाणार्या नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. कॅनॉलमध्ये मुरुम भरल्यामुळे खालील बाजूस असणारे शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गातून संबंधीता विरुध्द संतापाची लाट उसळली आहे.