सोलापूर – सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्स, सोलापूर येथे विज्ञान व भूगोल शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रयोग, प्रतिकृती, मॉडेल्स आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून विज्ञान व भूगोल विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी व विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा पद्धतीने कसे करता येते, याचे प्रात्यक्षिक या परिषदेत सादर करण्यात आले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, सोलापूरचे उपाध्यक्ष श्री. इंद्रजीत पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. राजशेखर शिवदारे होते. परिषदेचे प्रमुख वक्ते खगोलशास्त्र अभ्यासक श्री. हेमंत मोने आणि प्राणीशास्त्र व खगोलशास्त्र अभ्यासक श्री. अभय पुराणिक यांनी विज्ञान व खगोलशास्त्रातील विविध संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणे व मॉडेल्सच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती न देता प्रयोग, निरीक्षण आणि अनुभवाच्या माध्यमातून शिकविल्यास विषय अधिक प्रभावीपणे समजतो, यावर वक्त्यांनी भर दिला.
. विज्ञान आणि भूगोल विषयातील अनेक क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी विविध शैक्षणिक साधनांचा वापर, प्रतिकृती व मॉडेल्सची निर्मिती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि कृतीआधारित अध्यापन यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. शिक्षकांनी आपल्या अध्यापनात प्रयोगशीलता आणि नावीन्य आणल्यास विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होईल, असा संदेश परिषदेतून देण्यात आला.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. एस. सुत्रावे यांनी केले, तर डॉ. आर. एस. धनवे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून श्री. सिद्धाराम जोडभावी, श्री. रमेश बसाटे, विश्वस्त श्री. भीमाशंकर शेटे, डॉ. सिद्धेश्वर वाले, अण्णासाहेब कोतली, डॉ. कलशेट्टी, डॉ. कापसे, पूजा बाजपेयी, श्रुती गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विज्ञान व भूगोल विषयाचे शिक्षक आणि प्राध्यापक उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात श्री. राजशेखर शिवदारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयोगशील व कृतीआधारित अध्यापनाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले. सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांनी शिक्षण क्षेत्राला दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा ज्ञानवर्धक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
. सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ही परिषद शिक्षकांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. विज्ञान व भूगोल विषयातील अध्यापन अधिक प्रयोगशील, आनंददायी आणि परिणामकारक करण्यासाठी या परिषदेने नवी दिशा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. डॉ. महादेव कांबळे यांनी मानले.
Post Views: 17