सोलापूर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नवे शिक्षणाधिकारी मिळाले असून, विशाल पांडुरंग मुळे यांची प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत ही नियुक्ती केली आहे.
राज्यसेवा परीक्षेतून शिक्षणाधिकारी पदावर निवड झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या सुधारित प्रशिक्षण कार्यक्रमानुसार राज्यातील एकूण १३ परिविक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांमध्ये ३० आठवड्यांसाठी शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार विशाल मुळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.
विशाल मुळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२१ मधून शिक्षणाधिकारी (वर्ग-१) पदासाठी निवड झालेले अधिकारी आहेत. या परीक्षेचा निकाल २०२२ मध्ये जाहीर झाला होता.
मुळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या कालावधीसाठी ३० आठवड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे प्रश्न तसेच विभागीय कामकाजाचा अनुभव त्यांना मिळणार आहे.
Post Views: 11