सोलापूर : शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल, पाणीपुरवठा, ‘बी-२’ सत्ता प्रकार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ई-बसेस आणि स्वच्छता यंत्रणेला प्राधान्य देत विविध कामांना गती देण्यात आली आहे. महागाई भत्ता तीन टक्के वाढ करण्यात येत असून त्यामुळे एकूण ५० टक्के महागाई भत्ता होणार आहे. घरभाडे भत्त्यात २ टक्के वाढ, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा १,५०० रुपये आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात दरमहा १ हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर विनायक कोंड्याल यांनी केली.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. निरोगी समाजासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे, पाण्याचे संवर्धन व काटकसरीने वापर करण्याचा संकल्पही करण्यात आला. विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, गटनेते अमोल बापू शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव, वंदना गायकवाड, नगरसेवक प्रशांत पल्ली, नय्युम सालार, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यालेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांनी केले.
यानंतर महापौर कोंड्याल यांनी महापालिकेच्या विकासकामांचा आणि आगामी योजनांचा आढावा मांडला. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेचे हस्तांतरण ९३ टक्के पूर्ण झाले असून, प्रकल्पातील महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी प्रक्रिया गतिमान केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित कागदपत्रे सुपूर्द करण्यात आले आहेत.
सोलापूरच्या इतिहासातील महत्त्वाकांक्षी १,४७८.४२ कोटी रुपयांच्या ‘सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनल डिस्ट्रिब्युशन सिस्टम’ प्रकल्पाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. २०६० पर्यंतची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असून जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे. १७० एमएलडी क्षमतेची उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून, पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी जमीन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘बी-२’ सत्ता प्रकारामुळे रखडलेले खरेदी-विक्री व बांधकाम व्यवहार आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा ९ हजारांहून अधिक कष्टकरी कुटुंबांना लाभ होणार असून, सुमारे ४० ते ५० हजार कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. महापालिकेलाही मिळकत कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे. या विषयासाठी आ. देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे कोंड्याल यांनी सांगितले.
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव
२०१ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांना कायम करण्याचा प्रस्ताव १८ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून तो ५० टक्के, घरभाडे भत्त्यात दोन टक्के वाढ, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दररोज ५० रुपये म्हणजेच दरमहा १,५०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनातही दरमहा एक हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.फेब्रुवारी २०२६ अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेची प्रकरणे निकाली काढून चार कोटी रुपयांचे दायित्व देण्यात येणार आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या दायित्वाचा तिसरा हप्ता तसेच शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता देण्याची घोषणाही करण्यात आली. कर्मचाऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन जीपीएफ स्लिप उपलब्ध करून देणारी सोलापूर महापालिका महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरल्याचे त्यांनी सांगितले.
एनपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांचा हिस्सा, शासनाचा हिस्सा व व्याज मिळून ५२ कोटी रुपये शासनाकडे भरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पीएम ई-बस सेवा योजनेतून सोलापूरला १०० ई-बसेस मिळणार असून, पहिल्या टप्प्यात २० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथे ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे.
Post Views: 17