सोलापूर : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २० ई-बसेस शहराच्या सेवेत दाखल होत असून, उपलब्ध झालेल्या चार ई-बसेसचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवारी एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती सुनील खटके, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, कामगार व समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, उपायुक्त सोनाली यादव, सहायक आयुक्त शशिकांत यांच्यासह नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वंदना गायकवाड, सुधा आरळी-मोरे, रोहिणी तडवळकर, नगरसेवक आनंद जाधव, बिजू प्रधान, किसन जाधव, अक्षय अंजीखाने, राहुल कुलकर्णी, अनिल चराटे, नीलकंठ मतपती आदी उपस्थित होते.
ई-बसेसमुळे सोलापूरकरांना दर्जेदार, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चार रोड स्वीपर आणि एका जेटिंग मशीनचेही लोकार्पण करण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शहरातील रस्ते स्वच्छतेच्या कामाला गती मिळणार आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागांतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी ७२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यामध्ये १५ सफाई कामगार, ७ झाडूवाले, २३ बिगारी, शैक्षणिक पात्रतेनुसार १७ आणि अनुकंपा तत्त्वावरील १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे महापालिकेच्या नागरी सेवा अधिक प्रभावीपणे देण्यास मदत होणार आहे.
उड्डाणपुलासाठी ९३ टक्के जमीन
ताब्यात : पालकमंत्री गोरे
सोलापूरच्या विकासासाठी रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लागत असून, विमानसेवा, बी-२ तसेच उड्डाणपुलाच्या प्रश्नांवरही काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी ९३ टक्के जमीन ताब्यात आली असून, उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून कामाला लवकरच सुरुवात होईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
——
Post Views: 22