बार्शी – शहरातील भोसले चौक परिसरातून एका शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. होंडा शाईन कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल चोरीस गेली असून याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वसंत साधू आजबे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आजबे हे बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथे कुटुंबासह राहतात व शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी दैनंदिन वापरासाठी मार्च २०१५ मध्ये होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल खरेदी केली होती.
फिर्यादीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता आजबे यांनी आपली मोटारसायकल भोसले चौक येथे लावली. त्यानंतर ते टिळक चौक येथील नागोबा मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन ते पुन्हा भोसले चौकात आले असता ज्या ठिकाणी मोटारसायकल लावली होती, त्या ठिकाणी ती दिसून आली नाही.
आजबे यांनी परिसरात तसेच बार्शी शहर आणि लगतच्या भागात मोटारसायकलचा शोध घेतला. मात्र बराच शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने आपली मोटारसायकल चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेली मोटारसायकल होंडा शाईन, लाल रंगाची, २०१५ मॉडेल असून तिचा आरटीओ क्रमांक MH-13-CC-3748 असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्यात येत आहे.
Post Views: 14