बार्शी – शहरातील सुभाषनगर परिसरात घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या घराचे कुलूप व कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वेल्डिंगचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत वेल्डिंग मशीन, ग्राइंडरसह एकूण १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
याबाबत अरुण दत्तात्रय जानकर यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जानकर हे वेल्डिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते सध्या जामगांव येथे वास्तव्यास असून त्यांचे जुने घर बार्शी शहरातील सुभाष नगर परिसरात आहे. या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यांचे वेल्डिंगचे साहित्य घरात ठेवण्यात आले होते.
दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता घराचे काम आटोपून जानकर कुटुंबीयांसह जामगांव येथे गेले. दुसऱ्या दिवशी दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.४५ वाजता ते सुभाषनगर येथील घराच्या दुरुस्तीच्या ठिकाणी आले असता घराचा दरवाजा बंद दिसला; मात्र दरवाजाला लावलेले कुलूप गायब होते. दरवाजाला केवळ कडी असल्याचे दिसून आले. दरवाजा ढकलून पाहिल्यानंतर घरातील साहित्य चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये १० हजार रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, ३ हजार रुपयांचा ग्राइंडर, २ हजार ७०० रुपयांची फिटींग मशीन तसेच २ हजार रुपयांचे किरकोळ वेल्डिंग साहित्य, असा एकूण १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
घटनेनंतर जानकर यांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच शेजारी-पाजाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र चोरीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश करून साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणी दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री १० ते दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
Post Views: 11