बार्शी – शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने बार्शी शहर पोलिसांकडून विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १०६ वाहनांवर कारवाई करुन ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी ही विशेष मोहीम राबविली. बार्शी शहर बसस्थानक, कुर्डुवाडी रोड, शिवाजी कॉलेज परिसर तसेच मुख्य बाजारपेठेतील पांडे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान अनधिकृत पार्किंग करणारी वाहने, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, अनधिकृत बोर्ड लावणारे तसेच विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्यानुसार (MV Act) दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतूक शिस्त कायम राहावी, नागरिकांना वाहतुकीस अडथळ्याविना सुरक्षितपणे ये-जा करता यावी तसेच अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने बार्शी पोलिसांकडून अशा प्रकारच्या विशेष वाहतूक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करु नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.
बार्शी शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई पुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 3