सोलापूर – सोलापूर व पुणे रेल्वे विभागातील खासदारांची व मध्य रेल्वे प्रशासनाची मिटीग विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे यांच्या कार्यालयात दि. १९ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी रेल्वे प्रवासी सेल बार्शीच्यावतीने शैलेश वखारिया व कनिष्क बोकेफोडे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मागण्यांचे निवेदन सोपवले. या उच्चस्तरीय मिटींगमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत ‘ योजनेमध्ये समावेश करुन विकास करावा, अशी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी सकाळच्या सत्रामध्ये लातूर – पुणे इंटरसिटी एक्स.ची मागणी पुन्हा एकवेळ खासदारांनी रेल्वे प्रशासनापुढे ठेवली. अमरावती पुणेच्या टाइम टेबलचे पुनःरचना करुन ती दररोज करावी. बिदर – मुंबई – बिदर एक्स., नांदेड – पनवेल – नांदेड एक्स. या गाड्यांना आरक्षणामध्ये कोटा आहे. यामुळे लातूर, धाराशिव, बार्शीच्या प्रवाशांना बऱ्याच वेळेस आरक्षगण मिळत नाही किंवा ते वेटिंग दाखवते. हा कोटा हटवावा. हरंगुळ – हडपसर एक्स. दिवसा धावते. त्यामुळे या गाडीला ३ टिअर एसीचे भाडे न आकारता एसी चेअर कारचे भाडे आकरावे. मुंबई – लातूर विकेंड स्पेशल साप्ताहिक ट्रेन, मुंबई – चेन्नई (बार्शी, लातूर मार्गे ) साप्ताहिक ट्रेन, सोलापूर – नागपूर साप्ताहिक ट्रेन (बार्शी, लातूर मार्गे) या ट्रेन सुट्टी स्पेशल म्हणून अधूनमधून चालवल्या जातात या कायम साप्ताहिक कराव्यात. या आणि अशा बऱ्याच मागण्या खासदारांनी मध्य रेल्वे प्रशासनापुढे ठेवल्या व ही मिटीग केवळ औपाचारिकता न राहता यावर ठोस कार्यवाही करावी, अशी विनंती खासदारांनी राजीव श्रीवास्तव, महाप्रबंधक मध्य रेल्वे यांना केली.
या बैठकी मध्ये राजीव श्रीवास्तव G.M मध्य रेल्वे, के. के. मिश्रा DGM मध्य रेल्वे, राजेश वर्मा DRM पुणे आणि सुजीत मिश्रा DRM सोलापूर यांच्यासह विविध रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 4