सोलापूर : सोलापूरमधील ‘साहित्य सेवा संघ’ ही साहित्यिक संस्था आहे. माय मराठी भाषेच्या प्रचार – प्रसारासाठी या संस्थेकडून सातत्याने विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 : 00 वाजता एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर येथे अनुराधा विभुते लिखित ‘माऊलीची कुशी ‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा व विविध पुरस्काराचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
काव्यसंग्रहाचे प्रकाशन व पुरस्काराचे वितरण प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक तथा मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेखक प्रदीप पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार
कर्मण्यवादी डॉ. लक्ष्मण कार्ले यांना, साहित्यसेवा पुरस्कार प्रकाश जडे, प्राचार्या डॉ. नसीमा पठाण, जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, जेष्ठ साहित्यिक गोविंद काळे, जेष्ठ साहित्यिक संध्या धर्माधिकारी या मान्यवरांना तर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी.नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभानंतर जेष्ठ साहित्यिक मदन जवळगेकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे आणि सिंहगड कॉलेजमधील नवोदित विद्यार्थी कवींचे कवीसंमेलन होणार आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय इंगळे (आलूरकर) केले आहे.
—
Post Views: 11