बार्शी – म्हशी उधळून दुसरीकडे लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून दाम्पत्याला लाकडी काठी, दगड व बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बार्शी शहरातील भीमनगर जवळील लोकरे हॉस्पिटलसमोर घडली. या मारहाणीत पत्नीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळील हाड फ्रॅक्चर झाले असून पतीच्या डोक्यासह पाठ व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चारजणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत पांडुरंग चंद्रकांत व्हनकळस (वय ४३, रा. भीमनगर, बार्शी) यांनी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना जबाब दिला आहे. त्यांच्या जबाबानुसार, दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ते पत्नी रुक्मिणी यांच्यासोबत त्यांच्या पंधरा म्हशी चारण्यासाठी कासारवाडी रोड परिसरातील शेताकडे घेऊन जात होते.
भीमनगर कॉर्नरजवळील लोकरे हॉस्पिटलसमोर आले असता, त्याच परिसरात राहणाऱ्या अक्षय वाघमारे याने मोठ्याने ओरडून म्हशी उधळून दुसरीकडे लावल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. म्हशी उधळण्याचे कारण विचारले असता वाद वाढला. त्यावेळी अक्षय वाघमारे याच्यासह सागर ओहोळ, प्रेम ओहोळ व अंदाजे २० वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीने दाम्पत्याच्या हातातील लाकडी काठ्या हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अक्षय वाघमारे याने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात तसेच पत्नी रुक्मिणी यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ जोरात मारले. त्यामुळे रुक्मिणी यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच सागर ओहोळ याने पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर व नाकावर, तसेच रुक्मिणी यांच्या पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रेम ओहोळ याने दगडाने पांडुरंग यांच्या पाठीवर, तर अनोळखी व्यक्तीने लाकडी काठीने पाठीवर मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मारहाणीनंतर पती-पत्नी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. पांडुरंग यांच्या नाकातून व तोंडातून रक्त येत असल्याने पोलिसांनी उपचारासाठी यादी दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उपचारादरम्यान रुक्मिणी यांच्या डाव्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी अक्षय वाघमारे, सागर ओहोळ, प्रेम ओहोळ तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Post Views: 32