सांगोला – सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्या विकास प्रतिष्ठान, सोलापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड व प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, माता सरस्वती व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रस्ताविकेत डॉ.रणजीत देशमुख यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याविषयी माहिती दिली. मनोगतात संतोष माने यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत असे सांगितले. डॉ.अरुण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी नवनिर्मितीच्या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासेने आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे, असे सांगितले. इंजि.महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून अडचणींना न घाबरता सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.