सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्पनेतून’ सुनील नगर येथील जय भवानी मित्र मंडळ संचलित श्री वरदविनायक मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी रक्तदात्यांची भेट घेऊन त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. तसेच रक्तदान करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. परिसरातील युवक, नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उपक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश मंडळाने दिला. याच उपक्रमांतर्गत मंडळाच्या वतीने दीपोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, आवश्यक दिव्यांचे वाटप महापौरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान व दीपोत्सवाच्या माध्यमातून ‘सेवा हीच खरी साधना’ हा संदेश देण्यात आला.
यावेळी राजू चलमेटी, रमेश चक्राल, नरेश कोतम, राकेश चक्राल, प्रवीण बोड्डू यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.