सोलापूर : भारतीय हवाई दलाचे गाजत असलेले तेजस विमान, लष्कराचा मजबूत अर्जुन रणगाडा, इस्रोचे चांद्रयान मिशन आदींची निर्मिती सोलापुरात झाली असे म्हटल्यास धक्का बसेल. अर्थात ही गोष्ट तशीच आहे. मात्र सोलापुरातील एका अवलिया युवकाने या सर्वांची हुबेहूब मिनीएचर निर्मिती करून वेगळाच छंद जोपासला आहे.
रोहन अन्वेकर, वय 18 वर्ष. सध्या हा युवक मुंबईत मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मूळचा सोलापूरचा असलेल्या रोहनला वयाच्या नवव्या वर्षापासून मिनीएचर वस्तू निर्मिती करायचा छंद जडला. लहानपणापासून हॉलिवूडचे चित्रपट सारेच बघतात. त्याची रसभरीत वर्णनं करण्यात बहुतांश वेळ दवडतात. रोहननेही “स्टुअर्ट लिटिल” या हॉलीवुड चित्रपटात मिनीएचर सिटी पाहिली. त्या मिनीएचर सिटीमधील छोटे रस्ते, छोटे उड्डाण पूल आदी गोष्टी पाहून त्याचे मन त्याच्यावर जडले. आणि त्याला तशा मिनीएचर वस्तूंची निर्मिती करायचा ध्यास लागला. घरातील टाकाऊ पदार्थ.. कुठे कार्डबोर्ड, पेनच्या संपलेल्या रिफिल, टूथपेस्टची टोपणं अशा एक ना अनेक टाकाऊ वस्तूंची सांगड घालून मिनीएचर वस्तूंची निर्मिती करण्यात तो त्याचा वेळ घालू लागला.. पुढे त्याचा हा छंद पॅशनमध्ये ( वेड ) बदलला. प्रत्येक वस्तूचे बारीक निरीक्षण करून त्याची मिनिएचर प्रतिकृती करण्यात 15-15 दिवस घालून हुबेहूब तशी मिनीएचर वस्तू करून दाखवतो. वेळ वायफळ घालण्यापेक्षा या छंदात तो रमून जातो.
रोहनने अशाप्रकारे जवळपास 30 मिनीएचर प्रतिकृतींचे निर्माण केले आहेत. त्यात भगवान श्रीकृष्णाचे शो-पीस, छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी, मिनीएचर समोसा प्लेट, मिनीएचर अर्जुन रणगाडा, मिनीएचर केदारनाथ मंदिर, हम्पी होस्पेटचे मंदिर, इस्रोचे चांद्रयान.. त्याचे लॅन्डर व रोव्हर आणि काही महिन्यांपूर्वी बनवलेले तेजस विमानाचे छोटे मॉडेल सारेच लक्षवेधी आहेत.
निर्माण केलेल्या वस्तू रोहन इंस्टाग्राम, फेसबुक आदी समाजमाध्यमांवर टाकतो. तेजसच्या मिनिएचर मॉडेल साठी त्याला जवळपास 30 हजार व्हूज मिळाले आहेत. त्याने बनवलेले तेजसचे मॉडेल लोकांना इतके आवडले आहे की अनेकांनी त्याला त्याचे मिनीएचर मॉडेल विकत देण्यासंबंधी चौकशी केली आहे.
त्यांच्यामध्ये तेजस विमान निर्मिती करणाऱ्या एच ए एल (हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ) मधील काही अधिकारी, ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेले काही एन आर आय इंडियन आदी लोकांचा समावेश आहे. अर्जुन रणगाड्याच्या मिनीएचरसाठीही त्याच्याकडे मोठी मागणी आहे. मात्र तो या छंदातून मिळणारा आनंद पैशापेक्षा मोठा असल्याचे म्हणतो. तरीही त्याचे तेजसचे मिनीएचर मॉडेल एका व्यक्तीने मोठे मूल्य देऊन विकत घेतले आहे.
रोहन आपल्या या छंदासाठी आई, वडील व मोठा भाऊ तसेच काका व अन्य कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आवर्जून सांगतो. बारावीनंतर सीईटी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत तो सध्या प्रथम वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.. पुढे मेकॅनिकल क्षेत्रातच करिअरही करणार आहे. मात्र आपला हा छंद आयुष्यभर जोपासण्याचे त्याने ठरवले आहे.