सोलापूर : ‘जॉईन फॉर पीसतर्फे दरवर्षी समाजात वेगवेगळे क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, पुण्याचे ज्येष्ठ समाजसेवक जाहिदभाई शेख, नगरसेवक अमोल (बापू) शिंदे, दक्षिण सोलापूर येथील मुळेगाव तांडाचे सरपंच विजय उमाकांत राठोड, सामाजिक संस्था म्हणून आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांना देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, सचिव प्रा. जैनुद्दीन पटेल यांनी दिली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा जागतिक शांतता दिनी, म्हणजेच सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक 06.30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराशेजारी येथे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य अॅरड. मिलिंद शिवशंकर थोबडे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असणार आहे. या संस्थेचा उद्देश मानवतेची निस्वार्थ सेवा आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्याचे ध्येय बाळगणारी ‘जॉईन फॉर पीस’ ही अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण करणे आणि शांतता, समता, बंधुता तसेच मानवी हक्कांची जपणूक करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
समाजात शांतता व बंधुभाव नांदावा यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रतिवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येतात. समता व बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवता जोपासण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मागील सात वर्षांपासून ‘जेपी शांतता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.




















