जेऊर – पक्ष्यांच्या हालचाली, झाडांमधील बदल तसेच आकाशातील स्थितीचे निरीक्षण करून हवामानातील बदलांचा अंदाज घेता येतो, असे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी केले.
वाशिंबे (ता. करमाळा) येथील नवयुग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित हवामान मार्गदर्शन शिबिरात डख बोलत होते. यावेळी त्यांनी हवामानाचा अंदाज, पावसाचे संकेत, निसर्गातील बदल आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
हवामानाचा अंदाज सांगण्याची परंपरा आपल्या आजोबा व वडिलांकडून चालत आली आहे. २०१६ पासून सोशल मीडियामुळे या कामाला मोठी व्याप्ती मिळाली, असे डख यांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियावर आपल्या नावाने बनावट पोस्ट तसेच आपण दिलेल्या अंदाजामध्ये फेरफार करून चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हवामान अंदाजाची खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अल निनोबाबतही केले मार्गदर्शन
अल निनोविषयी माहिती देताना डख म्हणाले की, दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाच्या परिसरातील प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानातील वाढीशी अल निनोचा संबंध आहे. भारत आणि अमेरिका पृथ्वीच्या विविध बाजूस असल्यामुळे अल निनोचा भारतावर थेट परिणाम होत नाही, असे त्यांनी सांगितले.
पक्षी, झाडे, वाऱ्याची दिशा, आकाशातील ढगांची रचना आणि वातावरणातील बदल यांचे निरीक्षण करून हवामानातील संभाव्य बदलांचे संकेत मिळू शकतात, असेही डख यांनी स्पष्ट केले.
उपस्थित शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज, पावसाचे संकेत आणि शेती नियोजनाबाबत विविध प्रश्न विचारले. त्यावर पुढील आठ दिवसांत करमाळा तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास मकाईचे संचालक गणेशभाऊ झोळ, उपसभापती अजित विघ्ने, संचालक अजित झंझुर्ने, माजी सरपंच भगवान डोंबाळे, कल्याण शिंदे, प्रा. जाकीर शेख, राजाभाऊ जगदाळे, शैलेश झोळ, रणजीत शिंदे, सतीश झोळ, किशोर झोळ, भारत शिंदे, अशरफ शेख, नवयुग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुमित डोंबाळे, उपाध्यक्ष अजय शिंदे, दिग्विजय पवार, जयदीप झोळ, समाधान पवार, माऊली झोळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 37