सोलापूर : पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेला, विहिरी कोरड्या पडल्या, पिके करपली आणि जनावरांसह शेतकऱ्यांसमोर पाणी व चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीची दाहकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत अनुभवली. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, पंचनामे ही कायदेशीर प्रक्रिया आहे; मात्र शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या प्रक्रियेत अडकवून ठेवणे हा सरकारचा हेतू नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने मदतही सरसकट देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
खरीपापुरते मर्यादित नाही; रब्बीसाठीही मदत करणार आश्वासन दिले. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठीही आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळाच्या काळात पुढील तीन-चार महिने आव्हानात्मक राहणार असून या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.
पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्याची उपलब्धता यावर शासनाचे विशेष लक्ष राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त भागासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कारंब्याच्या शिवारातील करपलेली पिके, घटलेली पाण्याची पातळी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता ही उत्तर सोलापूरच्या कोरड्या दुष्काळाचीच जिवंत कहाणी आहे. मुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता पाहणीपलीकडे प्रत्यक्ष मदत कधी आणि किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
### **कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत सरकार थांबणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जमाफीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर केली आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी उपायांची गरज असल्याचे सांगितले. दरवर्षी पावसावर अवलंबून राहण्याऐवजी पाण्याच्या उपलब्धतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जलसंधारण, पाणी उपलब्धता आणि सिंचनाच्या उपाययोजनांमधून भविष्यातील दुष्काळाचे संकट कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे.
### **चौकट |
मुख्यमंत्र्यांनी पाहिले १०० टक्के जळालेले सोयाबीन!
उत्तर सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. अशोक भोरे यांच्या शेतातील उडीद पिकाची पाहणी केल्यानंतर संजय आदाटे यांच्या शेतातील जळालेले सोयाबीन पीक पाहून नुकसानीची तीव्रता जाणून घेतली. जळालेले सोयाबीन पाहताना पिकाचे जवळपास १०० टक्के नुकसान झाल्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आली.
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल,” अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केली. त्यामुळे प्रत्यक्ष बांधावर पाहणी झाल्यानंतर आता मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 10