सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन क्षमता नागरिक, विद्यार्थी, पर्यटक तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सोलापूर पर्यटन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय, पुणे आणि एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प (ITDP), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी, ग्रामीण, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक व्यापक करण्यासाठी विशेष घटक आधारित गावे (TBA) या उपक्रमाशीही या सप्ताहाची सांगड घालण्यात आली आहे.
*पाच गावांमध्ये विशेष पर्यटन अनुभव*
१.भालेवाडी, ता. मंगळवेढा – दूध व मिलेट पर्यटन : भालेवाडी येथे दूध व मिलेटवर आधारित ग्रामीण पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. मालदांडी ज्वारी, स्थानिक कृषी पद्धती, पशुपालन, ग्रामीण जीवनशैली तसेच स्थानिक उत्पादनांची माहिती पर्यटकांना करून देण्यात येणार आहे.
२.बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर – गवताळ सफारी : बोरामणी येथे गवताळ सफारीच्या माध्यमातून गवताळ परिसंस्था, जैवविविधता आणि निसर्ग पर्यटनाचा अनुभव देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३.नान्नज, ता. उत्तर सोलापूर – माळढोक अभयारण्य : नान्नज परिसरातील माळढोक अभयारण्य हे वन्यजीव व निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. माळढोक व इतर पक्षी, गवताळ अधिवास आणि वन्यजीव संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना व पर्यटकांना माहिती देण्यात येणार आहे.
४.चिंचणी, ता. पंढरपूर – कृषी व ग्रामीण पर्यटन : चिंचणी येथे ग्रामीण जीवनशैली, कृषी आधारित उपक्रम, स्थानिक संस्कृती तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून विकसित होणाऱ्या पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
५.लोंढेवाडी, ता. माढा – कृषी व ग्रामीण पर्यटन : लोंढेवाडी येथील कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेती, ग्रामीण जीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना देण्यात येणार आहे.
*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुभवाधारित सहलींवर भर*
पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व अनुभवाधारित सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, जैवविविधता, वन्यजीव, स्थानिक संस्कृती आणि पर्यटन व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, पर्यटन केंद्र चालक आणि ग्रामीण उद्योजक यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणण्यात येणार आहे. तसेच स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी स्थानिक अल्पोपहार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
*’आपल्या नजरेतलं सोलापूर’ या संकल्पनेवर रील व छायाचित्रण स्पर्धा*
सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, निसर्ग, संस्कृती, ग्रामीण जीवनशैली, ऐतिहासिक व धार्मिक वारसा तसेच स्थानिक पर्यटन अनुभव नागरिकांच्या नजरेतून जगासमोर आणण्यासाठी रील आणि छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित आपले रील्स व छायाचित्रे
itdpsolapur@gmail.com या ई-मेलवर दि. ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावीत. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विद्यार्थी, युवक, छायाचित्रकार, सोशल मीडिया क्रिएटर्स तसेच पर्यटनप्रेमींनी सहभागी होऊन ‘आपल्या नजरेतलं सोलापूर’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*स्थानिक पर्यटनासोबत रोजगाराच्या संधींनाही चालना*
सोलापूर जिल्ह्याची पर्यटन ओळख केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित न ठेवता कृषी, ग्रामीण, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाचा समावेश असलेले बहुआयामी पर्यटन गंतव्य म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, स्वयं-सहायता गट, ग्रामीण उद्योजक आणि पर्यटन सेवा पुरवठादारांना पर्यटनाशी जोडून स्थानिक रोजगार व उत्पन्नाच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, पर्यटन व्यावसायिक, सोशल मीडिया क्रिएटर्स आणि पर्यटकांनी ‘सोलापूर पर्यटन सप्ताह’मध्ये सहभागी होऊन जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा अनुभव घ्यावा तसेच रील व छायाचित्रण स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*चौकट*
“सोलापूर पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी, ग्रामीण, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. नागरिक, विद्यार्थी व पर्यटनप्रेमींनी पर्यटन सप्ताहासोबतच रील व छायाचित्रण स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि आपल्या नजरेतून सोलापूरचे पर्यटन जगासमोर आणावे,” असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन अधिकारी श्री. लक्ष्मण कसेकर यांनी केले आहे.
*****
Post Views: 16