बार्शी – केवळ शिक्षण घेऊन पदवी मिळविणे हा युवकांच्या विकासाचा अंतिम टप्पा नसून, समाजाशी जोडले जाणे, सामाजिक प्रश्न समजून घेणे आणि आपल्या क्षमतेचा उपयोग समाजहितासाठी करणे हीच शिक्षणाची खरी फलश्रुती आहे, असा संदेश देत बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. कदम होते. राष्ट्रीय सेवा योजना बार्शी विभागीय समन्वयक डॉ. दामाजी भिसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
NSS गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वयंसेविका तनिष्का गवळी हिने प्रास्ताविकातून दिनाचे महत्त्व व कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. केदार मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
मार्गदर्शन करताना डॉ. भिसे यांनी २४ सप्टेंबर १९६९ रोजी देशातील ३७ विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झाल्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. समाजसेवा, नेतृत्व, संघभावना, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्व या मूल्यांची जडणघडण युवकांमध्ये करण्यामागील योजनेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
‘Not Me But You’ या ब्रीदवाक्याचा अर्थ स्पष्ट करताना स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून त्यासाठी पुढाकार घेण्याची वृत्ती युवकांनी विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबत प्रत्यक्ष सामाजिक अनुभव मिळविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ‘माय भारत’ पोर्टल या युवकांसाठीच्या व्यासपीठाकडेही त्यांनी लक्ष वेधले. अनुभवाधारित शिक्षण, कौशल्यविकास, विविध उपक्रमांमधील सहभाग आणि आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. भविष्यातील करिअरच्या दृष्टीनेही अशा अनुभवांचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना त्यासाठी आवश्यक तयारी, शिस्त, संघभावना आणि सक्रिय सहभाग यांचे महत्त्वही त्यांनी सांगितले. ‘स्वयंसेवक म्हणून मिळणारा अनुभव हा वर्गखोलीबाहेरील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे,’ असा विचार त्यांनी मांडला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी आजची पिढी तंत्रज्ञानाच्या एका ‘टच’वर अनेक कामे करणारी आहे; मात्र या तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ सोयीसाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी करणे गरजेचे आहे, असे सांगितले. भारताला विकसित राष्ट्राच्या दिशेने नेण्याची जबाबदारी आजच्या युवकांच्या खांद्यावर असून त्यासाठी उपलब्ध डिजिटल व्यासपीठांचा आणि संधींचा योग्य वापर करावा, असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमास १६९ स्वयंसेवकांची उपस्थिती लाभली. आभार रामराज शिंदे यांनी मानले.
Post Views: 47